घराच्या वाटणीत हिस्सा मागणाऱ्या मुलाचा बाप आणि भाऊ कडून खून,जळगांव जिल्हा भडगाव तालुक्यातील बाळद येथील घटना!
बाप-लेकाला अटक
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याच्या कारणावरून चिडलेल्या बाप आणि भावाने तरुणाचा अमानुषपणे खून केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) असे असून, त्याने घराच्या वाटणीत आपला हक्क मागितला होता. यामुळे घरात वाद सुरू झाला आणि रात्री १० वाजेच्या सुमारास त्याचा भयंकर शेवट झाला. आरोपी वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी बाळूला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर व छातीवर गंभीर वार करत त्याचा खून केला.
घटनेनंतर भडगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील यांच्या माहिती वरून
भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहे.