Akola news:कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन, आत्मा व कृषी विभागाचा उपक्रम
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट तालुका यांचे अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन ता.२५ जून ते १ जुलै या कालावधीत करण्यात येत आहे.या सप्ताहामध्ये तालुक्यातील गावागावात शेतकरी सभा,
प्रशिक्षण,कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने प्रकल्प संचालक आत्मा डॉ.मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांचे मार्गदर्शनात तालुक्यातील मौजे मरोडा येथे आत्मा अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्मा यंत्रणा अकोट चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेशकुमार नेमाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी,उमेद प्रकल्पाचे तालुका समन्वयक नितीन वाघ,कृषी सहाय्यक एस.पी. सोनोने आदींची उपस्थिती होती.
सभेमधे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेशकुमार नेमाडे यांनी आत्मा योजना, पीएमएफएमई योजना, नैसर्गिक शेती योजना याबाबत तर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व,माती परीक्षण महत्व,बीजप्रक्रिया,आत्मा योजना अंतर्गत गट नोंदणी प्रक्रिया आदींबाबत उपस्थित महिला शेतकरी यांना मार्गदर्शन केले. नितीन वाघ यांनी उमेद अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सभेमध्ये माहिती दिली.
याप्रसंगी रा.अ.सु.अभियान पौष्टिक तृणधान्य सन २०२३-२४ अंतर्गत शेत तिथे तृणधान्य मोहीम अंतर्गत ज्वारी बियाणे मिनिकीट महिला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली.