पाचोरा शहरात श्वान निर्बीजीकरण मोहीम सुरू
Dog sterilization campaign started in Pachora city
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा शहरात दिवसेंदिवस वाढणारी श्वान संख्या लक्षात घेता भविष्यात श्वान संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पाचोरा नगरपरिषद मार्फत श्वान निर्बीजीकरण सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी, जळगाव यांनी सदर मोहीम घेण्याबाबत नगरपालिकांना सूचना दिल्या होत्या. शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे व परत त्याच परिसरात सोडणे हे काम नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था,नंदुरबार यांना देण्यात आलेले आहे. शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण सदर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. निर्बीजीकरण व लसीकरण केलेल्या श्वानांना विशिष्ठ मार्किंग करण्यात येणार आहे.आतापर्यंत शहरातील बाहेरपुरा, संभाजी नगर, भाजीपाला मार्केट, देशमुखवाडी, रसूल नगर, बहिरम नगर,भारत डेअरी,सिंधी कॉलनी या विविध भागातून आतापर्यंत १२५ श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे काम सदर संस्थेने सुरू केले आहे.आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल व आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारु यांचे देखरीत सदर मोहीम सुरू असून उर्वरित भागातही मोहीम लवकरच सुरू करण्यात येईल याची माहिती मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी दिली आहे.