जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा कुऱ्हाड येथे निषेध व श्रद्धांजली सभा
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
कुऱ्हाड तालुका पाचोरा- दि.२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कुऱ्हाड येथे गुरुवार रोजी सायंकाळी निषेध व्यक्त करण्यात आला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना अनेक पर्यटक राज्यभरात विविध ठिकाणी सहलीसाठी जात असतात जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या पर्यटकांना आपला धर्म विचारून दहशतवाद्यानी गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात एकूण २६ भारतीय मृत्यूमुखी पडले.तर काही जखमी झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कुऱ्हाड येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत मेणबत्ती पेटवून घटनेचा निषेध व्यक्त केला. यात पत्रकार सुनील लोहार यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की केंद्र सरकारने या भ्याड हल्ल्यावर कठोर पावले उचलावीत व दहशतवाद्यांना कंठस्नान घालावे ,जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद बसेल. असे मत व्यक्त केले.त्यानंतर कुऱ्हाड येथील माळी समाज सचिव सचिन माळी यांनी देखील या घटने संदर्भात आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
गावातील ग्रामस्थांतर्फे सामुदायिक श्रद्धांजली देण्यात आली. या दुःखद प्रसंगी सरपंच डॉ. प्रदीप महाजन सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.