पुणे:छत्रपतींच्या विचारांचे वादळ निर्माण झाले तर भगवा ख-या अर्थाने फडकेल; शिवव्याख्याते निलेश चव्हाण
पुणे बिरो : स्वामी दळवी
पुणे : आज दूरचित्रवाणीच्या माध्यमातून ऐतिहासिक काल्पनिक पात्रांपर्यंत आपण का मर्यादित राहतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकविले. शून्यातून सुरुवात होवू शकते, हे दाखवून दिले. धैर्य आणि विश्वास असेल तर सगळी संकटे दूर होवू शकतात, ही त्यांची शिकवण होती. त्यामुळे छत्रपतींच्या या विचारांचे वादळ निर्माण केले, तर भगवा सगळीकडे ख-या अर्थाने फडकेल, असे मत शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांनी व्यक्त केले.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे न-हे येथे संस्थेच्या सभागृहात शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. निलेश चव्हाण यांचा पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. निलेश चव्हाण म्हणाले, आम्ही आमचा इतिहास अभ्यासला पाहिजे आणि सांगितला पाहिजे. आज केवळ इयत्ता चौथी पर्यंत शिवरायांचा इतिहास शिकविला जातो. मात्र, केजी ते पीजी पर्यंत शिवरायांचा हा इतिहास शिकविणे गरजेचे आहे. शिवरायांच्या विचारांचा ध्यास आपण घेतला पाहिजे. शिवचरित्र प्रत्येकाला जगायला शिकवते. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ महाराष्ट्राची नाही, तर संपूर्ण भारताची अस्मिता आहे.ऍड. शार्दूल जाधवर म्हणाले, मोठ्या व्यक्तीच्या जयंतीला दारू चे सेवन करणे, असे प्रकार सध्या सुरु आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांना त्रास देण्याच्या घटना घडतात. हे चित्र बदलण्यासाठी चांगले वक्ते आणून विद्यार्थ्यांना त्या व्यक्तींचे कार्य समजून सांगण्यासाठी संस्थेत बोलावले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचे कार्य जगभर पोहोचले आहे. आयुष्यात कोणाचे आदर्श घेऊन पुढे जायचे आहे, हा विचार आजच्या तरुणांनी केला पाहिजे.