भिकूनाना किवळकर यांचे सह्याद्री कारखान्यात मोठे योगदान – आमदार मनोजदादा घोरपडे
Big contribution of Bhikunana Kiwalkar in Sahyadri factory - MLA Manojdada Ghorpade
कराड : विद्या मोरे
भिकूनाना किवळकर यांचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीत फार मोठे योगदान आहे. त्यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन सह्याद्रीच्या उभारणीसाठी शेअर्स गोळा केले. आज पन्नास वर्षानंतर पुन्हा या संस्थापक सभासदांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पॅनलची निर्मिती झाली असून मोठ्या मताधिक्याने हे पॅनेल कारखान्याच्या निवडून येईल असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.
किवळ ता. कराड येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पॅनेलच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव जगदाळे, महेशबाबा जाधव,अशोकराव पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप साळुंखे, माजी सरपंच सुरेश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, अमोल मुळीक, सुरेश पवार, वैभव साळुंखे, सुभाष बाबर, सचीन साळुंखे, राजेंद्र साळुंखे, विलास साळुंखे, संजय पैलवान, सुदाम पैलवान, अमोल कोरडे, ऋषीकेश साळुंखे तसेच ग्रामस्थ सह्याद्रीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, आज सह्याद्री कारखाना कर्जाच्या खाईत लोटला आहे 35 वर्ष ज्यांच्या हातात कारखाना आहे त्यांनी चेअरमन असताना कारखान्याच्या विकासासाठी काय केले ते सांगावे. जुन्या गोष्टी सांगून निवडणुकीत लोकांना भूलथापा देण्यापेक्षा कारखान्याचा विकास मागे का राहिला हे लोकांना सांगावे. आज महाराष्ट्रात अनेक कारखाने चांगल्या पद्धतीने सुरू आहेत मात्र सह्याद्री कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे ते म्हणाले. उलट तेच आज गावोगावी जाऊन तेच कारखाना वाचवायची भाषा करतात मग कारखाना अडचणीत आणला कोणी असा सवाल आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.
सह्याद्री साखर कारखाना विजयानंतर ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कारखान्यातील कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. अडचणीतून कारखाना बाहेर काढून संस्थापक, सभासदांना कारखान्यात मानसन्मान मिळवून देऊ असे ते म्हणाले. यावेळी वसंतराव जगदाळे म्हणाले सह्याद्री साखर कारखान्यात आजपर्यंत एकतर्फी कारभार चालला आहे. सहकारात सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे मात्र विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीचे एका घरात केंद्रीकरण केले असून या निवडणूकीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सहकार तत्व जपण्यासाठी सभासदांनी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी प्रदिप साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासद,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थापक सभासदांवर विद्यमान चेअरमनांकडून अन्याय.
सह्याद्रीचे खरे मालक हे त्यावेळी कारखाना उभारणीत रक्ताचं पाणी करणारे जेष्ठ नेते भिकूनाना किवळकर, आबासाहेब पार्लेकर, आर. डी पाटील यांच्यासह अनेक जेष्ठ व समाजासाठी तळमळीने झटणारे लोक होते. त्यांच्यावर कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कायम दुजाभाव केला. स्वताच्या मुलाला पुढे करणे, कामगारांना त्रास देणे, ऊसाला योग्य वेळी तोडी न देणे अशा अनेक कारणांनी त्यांना माजी आमदार व्हावे लागले आता पाच तारखेनंतर ते माजी चेअरमन झालेले असतील.
– आमदार मनोजदादा घोरपडे