कराडला 26 जानेवारी रोजी ई कचरा संकलन मोहीम गांधी फाउंडेशनचा पुढाकार; 23 रोजी जनजागृती रॅली
कराड : विद्या मोरे
येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आजच नागरिकांनी जागृत होणे गरजेचे असून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल मार्गाने ई उपकरणांची विल्हेवाट लावणे गरजेचे असून त्या दृष्टीनेच कराड नगरपरिषद, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी फाउंडेशन, पूर्णम फाउंडेशन, एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लब यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी 9 ते 1 या वेळेत कराड शहरात ई कचरा संकलन मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यानिमित्ताने गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी ई-कचरा संकलन जनजागृती रॅलीचे आयोजन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगरपालिका आरोग्य विभागाचे देवानंद जगताप, पूर्णम फाउंडेशनचे अमोल कोडक, इंजीनियरिंग कॉलेजचे डॉ. कृष्णा अळसंदकर, जयदीप कुटे, एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे जालिंदर काशिद , सुखायू फाउंडेशनचे डॉ. मिहिर वाचासुंदर, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपचे ऍड. संभाजीराव मोहिते, निवृत्त अभियंता ए आर पवार उपस्थित होते.
26 जानेवारी रोजी वेळ 9.00 ते 1.00 कराड शहरात 27 ठिकाणी ई कचरा संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सोमवार पेठ नानी नानी पार्क, चावडी चौक, पाण्याची टाकी पेठ, पी डी पाटील संस्था मंगळवार पेठ, पांढरीचा मारुती मंदिर, बुधवार पेठ प्रभात टॉकीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, नगरपरिषद कार्यालय, शिवाजी हाउसिंग सोसायटी उद्यान, चांदणी चौक, फल्ले सायकल मार्ट, विठ्ठल चौक, आझाद चौक, सात शहीद चौक, भेदा चौक, दत्त चौक, शाहू चौक, कच्ची बिल्डिंग, गांधी ज्वेलर्स समोर, पी डी पाटील उद्यान जवळ, मार्केट यार्ड गेट नंबर एक, कार्वे नाका पाण्याची टाकी, मार्केट यार्ड, खराडे कॉलनी दत्त मंदिर, दौलत कॉलनी मंदिरासमोर, पोस्टल कॉलनी, शिक्षक कॉलनी अशा 27 ठिकाणी ई कचरा संकलन केले जाणार आहे.
या ई कचरा मोहिमेसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांचे यासाठी सहकार्य लाभणार आहे. ई कचऱ्यामधून संकलित केल्या जाणाऱ्या वस्तू रिसायकल करून तसेच संगणक, लॅपटॉप, टीव्ही व अन्य ज्या अशा वस्तू आहेत ज्या दुरुस्त करून पुन्हा त्या वस्तू गरजू विद्यार्थी तसेच विविध संस्था यांना वापरासाठी देण्यात येणार आहेत.
चार विभागात संकलित केला जाणारा हा कचरा सामान्य वस्तू, रुग्णालयातील वस्तू, सरकारी कार्यालये आणि रेस्टॉरंट आणि औद्योगिक वस्तू या ठिकाणचा संकलित केला जाणार आहे. यासाठी यापूर्वी व उद्या आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे जेणेकरून शहरातील नागरिकांना याबद्दल माहिती मिळेल.
ई कचरा म्हणजे नेमका कोणता कचरा 👇🏻
ज्या आयटम्स आम्ही रि-सायकल करू इच्छितो
सामान्य वस्तूः संगणक, दूरदर्शन, रेडिओ, सेल फोन, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हेव्ह, ओव्हन, सीडी प्लेयर, इलेक्ट्रॉनिक इस्त्री, पंखा, घड्याळ, हेअर ड्रायर, हीटर, एसी, टोस्टर, शेव्हर्स, व्हॅक्यूम, चार्जर, लॅपटॉप, इलेक्ट्रिक खेळणी, हेड फोन, सॅटेलाइट डिश, स्पीकर, व्हिडिओ कॅमेरा, लँडलाइन फोन, मोडेम आणि राउटर, अँप्लीफायर, व्हिडिओ गेम्स, किबोर्ड, बॅटरी, सेल, कॅल्क्युलेटर इ.
रुग्णालयातील वस्तूः संगणक, मॉनिटर, ईसीजी उपकरण, मायक्रोस्कोप, इनक्यूबेटर, इतर ई उपकरणे, किबोर्ड, मोडेम आणि राउटर इ.
सरकारी कार्यालयेः संगणक, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन, स्कॅनर, पंखा, ट्यूब लाईट, एसी, किबोर्ड, मोडेम आणि राउटर इ.
रेस्टॉरंट आणि औद्योगिक वस्तूः संगणक, बॉयलर, मिक्सर, सिग्नल जनरेटर, फॅक्स मशीन, ई-मशीन, कूलिंग आणि हीटिंग इक्विपमेंट्स, पेजर, ड्रिल, ग्राइंडर, किबोर्ड, मोडेम आणि राउटर इ.
आम्ही या ई-कचऱ्याचे काय करतो
आम्ही ई-वेस्टमधून संगणक आणि लॅपटॉप दुरुस्त करतो आणि ते ग्रामीण भागातील शाळांना मोफत वितरीत केले जाईल.
निरुपयोगी ई-कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट सरकारने मान्यताप्राप्त रिसायकलद्वारे केली जाईल.