सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.तसेच निर्धारित वेळेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने काम पूर्ण न केल्याची बाबही खेदजनक आहे

कराड : विद्या मोरे

सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.तसेच निर्धारित वेळेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने काम पूर्ण न केल्याची बाबही खेदजनक आहे. या कामासाठी संबंधितांना मुदतवाढ देण्यात आली असून अपघात टाळण्यासाठी 15 दिवसांच्या आत रस्ता खड्डेमुक्त करण्याच्या सक्त सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अदानी कंपनी व डीपी जैन कंपनीचे अधिकारी, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, त्याचबरोबर प्रांताधिकारी व तहसीलदार यांची संयुक्तिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आमदार डॉ. भोसले म्हणाले, महामार्ग रुंदीकरण कामादरम्यान अपघातांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे जे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात झालेले नाही. त्यामुळे संबंधित कंपनीला 17 जून 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 15 दिवसांच्या आत महामार्गावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता खड्डेमुक्त करण्याच्या सक्त सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. सदरची सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासनही संबंधितांनी दिले आहे. 15 दिवसानंतर पुन्हा आपण या कामाचा ची आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले, या कामादरम्यान कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, या दृष्टीने सर्व विभागांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तशा सक्त सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान संबंधित अधिकारी, तसेच नागरिकांनाही काही त्रुटी आढळल्यास त्या कळवाव्यात. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. तसेच सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाचा एक प्रतिनिधी नेमून एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. एखादा अपघात झाल्यास महामार्ग विभाग व मलकापूर नगरपालिकेच्या सर्व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होतील, या दृष्टीनेही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक नागरिकांच्या कोणत्याही किरकोळ अथवा गंभीर तक्रारींची दखल घेऊन त्या तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार असून संबंधित सर्व विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button